दिल्लीतील ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि ‘सरहद’
१९५४ साली तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे झालेल्या ३७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आता ७० वर्षे झाली आहेत. मराठ्यांनी अटकेपार आपला झेंडा नेला होता या गोष्टीला त्या काळी राजकीयदृष्ट्या जितके महत्त्व होते, तितकेच महत्त्व आजच्या काळात सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या मराठी साहित्य संमेलन दिल्लीला होण्याला आहे.
देशाला दिशा देणारे विचार महाराष्ट्रातून, त्यातही पुण्यातून पुढे येतात असा इतिहास असताना पुण्यातल्याच ‘सरहद’ संस्थेच्या विद्यमाने आयोजित होणारे हे आगामी संमेलन दिल्लीला होत आहे हे योग्यच म्हणायला हवे. पुणे ही देशाची वैचारिक राजधानी आहे आणि दिल्ली ही राजकीय आणि प्रशासकीय राजधानी. त्यामुळे कुठलाही विचार पुढे न्यायचा असेल, देशभर पोहोचवायचा असेल, तर तो दिल्लीमार्गे जाणे तर्कसंगतच आहे.
‘सरहद’ संस्था देशाच्या सीमावर्ती भागातल्या, विशेषतः हिंसाग्रस्त प्रदेशांमधल्या लोकांना आपुलकी, सेवा आणि मानवतेच्या मार्गाने जवळ करण्याकरता गेली तीस वर्षं कार्य करते आहे. देश जोडणे, विविध प्रदेशांमधल्या लोकांना साहित्य, संस्कृती, कला आणि सेवेच्या माध्यमातून एकत्र आणणे, हे संस्थेचे मुख्य कार्य आहे.
संस्था जरी पुण्यात असली, तरी संस्थेच्या कार्याचा केंद्रबिंदू दिल्ली राहिलेला आहे. पंजाबच्या असो, काश्मीर असो वा ईशान्य भारत, संबंधित प्रश्नांकरता दिल्लीमध्ये प्रयत्न करणे, राष्ट्रपती व पंतप्रधानांपासून ते विविध मंत्रालयांशी संपर्क साधणे, वेळोवेळी संत नामदेव पुरस्कार, लल देद पुरस्कार, पुस्तक प्रकाशन असे समारंभ दिल्लीत आयोजित करणे अशा विविध कारणांकरता संस्था दिल्लीशी व दिल्लीमध्ये सुपरिचित आहे. आता तर संस्थेने दिल्लीला आपले एक केंद्रदेखील सुरू केले आहे. श्री. अतुल जैन हे तेथील कामकाज पाहतात.
आज देश आर्थिक, सामरिक, परराष्ट्रव्यवहारविषयक आणि तंत्रज्ञानविषयक क्षेत्रांमध्ये अवघे विश्व कवेत घेऊ पाहात असताना गरज आहे ती अंतर्गत सामाजिक ऐक्य टिकवण्याची आणि ते सांभाळण्याची. विविधतेत एकता, हम सब एक हैं या निव्वळ घोषणा न राहता वास्तव तसे असणे अतिशय गरजेचे आहे. ‘सरहद’ नेमके हेच कार्य आपल्या परीने नेटाने करते आहे.
२०१५ साली ‘सरहद’ संस्थेने ८८ वे मराठी साहित्य संमेलन पंजाबमधल्या घुमान या संत नामदेवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आयोजित केले होते. त्या गावामध्ये मराठीशी फारसा संबंध नसूनही सामान्य जनतेमध्ये या साहित्य संमेलनाबद्दल प्रचंड औत्सुक्य अनुभवाला आले. त्याचबरोबर, महाराष्ट्रातूनही हजारो साहित्यप्रेमी त्या निमित्ताने घुमानला गेले व तिथल्या लोकांमध्ये प्रेमादरपूर्वक मिसळले. त्यातून अनेकांचे ऋणानुबंध त्या गावाशी जुळले.
त्या तुलनेत दिल्लीमध्ये मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे व आगामी साहित्य संमेलनामुळे त्यांना एक आगळा आनंद मिळेल. मराठी ग्रंथखरेदी, लेखक-कवींशी भेट अशा अनेक अंगांनी दिल्लीकर मराठी भाषिकांकरता ही एक पर्वणी ठरावी.