सरहद, पुणे आयोजित
महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने
महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जयंती वर्षानिमित्त महिला अधिकाऱ्यांचे

पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२६

महाराणी ताराबाई

प्रेरणास्थान: महाराणी ताराबाई

मराठ्यांच्या इतिहासात महाराणी ताराबाई यांचे नाव अजरामर आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सून आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी असल्या, तरी त्यांचे योगदान केवळ राजघराण्यापुरते मर्यादित नव्हते. स्वराज्य अत्यंत संकटात असताना त्यांनी स्वतः युद्धाची धुरा वाहिली. नेतृत्व, धैर्य, मुत्सद्देगिरी आणि गनिमी काव्याच्या आधारे त्यांनी मराठ्यांचे स्वातंत्र्य टिकवून ठेवले. महाराणी ताराबाई म्हणजे मराठा स्वराज्याची अस्मिता, शौर्य आणि स्वाभिमानाचे जिवंत प्रतीक होय. महाराणी ताराबाईंचे व्यक्तिमत्त्व प्रभावी होते आणि कार्यशक्ती दांडगी होती, त्या मराठा साम्राज्याच्या धाडसी व दूरदर्शी शासक होत्या.
कवि गोविंद यांनी महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन करताना म्हटले आहे
“दिल्ली झाली दीनवाणी | दिल्लीशाचे गेले पाणी |
ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||
ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते |
खचो लागली तेवि मते | कुराणेही खंडली ||
रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली |
प्रलायाची वेळ आली | मुगलहो सांभाळा” || हे वर्णन त्यांच्या धैर्याचे प्रतीक आहे.

Maharani Tarabai

टाईमलाईन

१६७५
जन्म व बालपण

महाराणी ताराबाईंचा जन्म इ.स. १६७५ साली मोहित्यांच्या घराण्यात तळबीड येथे झाला. त्यांचे वडील हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते. बालपणापासूनच ताराबाई बुद्धिमान, धाडसी आणि शिस्तप्रिय होत्या. त्यांना तलवारबाजी, तिरंदाजी, घोडेस्वारी यांसह लष्करी शिक्षण देण्यात आले होते. तसेच राज्यशास्त्र, राजकारण व नीतिशास्त्राचेही संस्कार त्यांच्यावर झाले. वडिलांच्या मार्गदर्शनामुळे आणि शिवाजी महाराजांच्या विचारांमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले. राजाराममहाराज रायगडावर संभाजीमहाराजांच्या नजरकैदेत होते त्याच काळात संभाजीमहाराजांनी त्यांचे लग्न हंबीरराव मोहित्यांच्या या कन्येशी करून दिले. विवाहाच्या वेळी त्यांचे वय आठ वर्षांचे आणि राजाराममहाराजांचे तेरा वर्षांचे होते.ताराबाईंचे आरंभीचे वैयक्तिक जीवन रायगडाच्या कैदेत आणि नंतर शत्रूचा पाठलाग टाळण्यासाठी या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर मुक्काम करण्यात गेले. त्या अत्यंत बुद्धिमान आणि तडफदार असल्यामुळे ,राजकारणातील उलाढाली आणि युद्धकौशल्य आत्मसात करायला त्यांना वेळ लागला नाही. बुद्धिमान, धाडसी आणि शिस्तप्रिय होत्या.

१७००
राज्यकारभार

सिंहगडावर छत्रपती राजाराम महाराजांचे निधन झाल्यानंतर स्वराज्य अत्यंत संकटात सापडले. छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज मोगलांच्या कैदेत असल्यामुळे सत्ता कोणी सांभाळायची हा प्रश्न निर्माण झाला. अशा वेळी महाराणी ताराबाई पुढे आल्या. त्यांनी आपला पुत्र शिवाजीला गादीवर बसवून प्रत्यक्ष राज्यकारभार स्वतःकडे घेतला. राज्यातच राहून त्यांनी सर्व सरदार, प्रतिनिधी व हुकूमतपन्ह्यांना एकत्र ठेवले आणि स्वराज्याची सूत्रे हातात घेतली. हा काळ स्वराज्यासाठी अत्यंत महाकठीण आणि निर्वाणीचा होता. औरंगजेब स्वराज्याचा कायमचा अंत करण्यासाठी इरेला पेटला होता. औरंगजेब स्वराज्य संपवण्याच्या उद्देशाने दक्षिणेत उतरला होता. अशा संकटसमयी महाराणींनी पारंपरिक लढाईपेक्षा वेगळी, चलाख आणि दूरदृष्टीची युद्धनीती अवलंबली. औरंगजेबच्या बलाढ्य मुघल सत्तेला त्यांनी धैर्य, मुत्सद्दीपणा व गनिमी काव्याने जबर धक्का दिला.अवघ्या २४–२५ वर्षांच्या वयात महाराणी ताराबाई औरंगजेबसारख्या बलाढ्य मुघल सम्राटाशी सलग साडेसात वर्षे झुंज देत राहिल्या पण पराभूत झाल्या नाहीत. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मोगल सैन्याला सतत हुलकावणी दिली.ळ लागला नाही.

१७०८
मराठा सैन्याच्या हालचाली व आघाड्या

गडांना वेढा पडलेला असताना ह्या परिस्थितीचा महाराणी ताराबाईंनी भरभरून फायदा उठवला. त्यांनी मोगलांच्या प्रतिकाराची २ सूत्री योजना आखली होती असे दिसते. मराठयांच्या छोट्या छोट्या तुकड्या ज्या किल्ल्याला वेढा पडला असेल त्या ठिकाणी मोगल फौजेवर बाहेरून हल्ला करून त्यांना वारंवार तडाखे देत होत्या. किल्ले घेण्यात येत असलेल्या अपयशाने हैराण झालेल्या फौजेवर असे जबरदस्त आघात होत होते. दुसरीकडे महाराणींनी आपले सरदार मोठ्या फौजेच्या तुकड्यांसोबत दक्खनच्या बाहेर मोगली सुभ्यांवर पाठवून अनेक नव्या आघाड्या उघडल्या. विशाळगडाच्या वेढ्यासमयी महाराणींनी आपल्या फौजा औरंगाबाद आणि फोंड्याच्या दिशेने पाठवल्या. औरंगाबादच्या संरक्षणार्थ आलेल्या जुल्फिकारखानाला पळवून लावून मराठा फौज पुढे वऱ्हाड प्रांताकडे वळाली. त्याचवेळी फोंड्याच्या दिशेने बहिर्जी घोरपडेंच्या नेतृत्वाखाली एक फौज भीमगड भागात स्वारीसाठी उतरली. त्याचसुमारास अजून एक मोठी फौजेची तुकडी महाराणी ताराबाईंनी कृष्णाजी सावंत ह्यांच्या बरोबर थेट माळव्या वर धाडली. नर्मदेच्या पलीकडे धामधूम माजवून मोठी खंडणी घेऊन कृष्णाजी सावंत परत महाराष्ट्रात परतले. १७०० ते १७०७ या काळात शेकडो लढाया होऊनही मराठ्यांनी राज्य टिकवलेच नाही, तर विस्तारलेही. गनिमी काव्याच्या युद्धनीतीमुळे मोगल सैन्याची रसद तोडली गेली, पाणवठ्यांवर दहशत निर्माण झाली आणि शत्रू कायम भयग्रस्त राहिला. किल्ल्यांवरील वेढ्यांनाही मराठ्यांनी समर्थपणे तोंड दिले. अनेक किल्ले पैसे घेऊन सोडले गेले आणि त्या पैशातून नवीन फौज उभी करण्यात आली. मराठा फौजांनी माळवा, खानदेश, कर्नाटकापर्यंत स्वाऱ्या करून मुघल साम्राज्य हादरवले.

अंत
स्वराज्याचे संरक्षण

“औरंगजेबाला सळो की पळो करून सोडणारी रणरागिणी,रणांगणावर ज्यांच्या धैर्याने दिल्ली हादरली," आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या स्वराज्याच्या हितासाठी झगडत राहिल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जवळपास २७ वर्षे मोगलांविरुद्ध संघर्ष केला. त्या महाराणी ताराबाईंचा अंत सिंहगडावर झाला , पण स्वराज्य रक्षणाची त्यांची ज्वाला इतिहासात अजरामर झाली.” “ज्यांच्या धैर्याने स्वराज्य जिवंत राहिले, त्या महाराणी ताराबाई सिंहगडावर अमरत्वात विलीन झाल्या.” “८६ वर्षांचे आयुष्य रणासाठी वाहणाऱ्या महाराणी ताराबाई देहाने गेल्या, पण त्यांच्या शौर्याची सिंहगर्जना इतिहासात घुमत राहिली.” औरंगजेबाचा पराभव आणि स्वराज्याचे अस्तित्व टिकणे, हे त्यांच्या कर्तृत्वाचे सर्वोच्च स्मारक आहे. या शूर, बुद्धिमान आणि दूरदृष्टीच्या रणवाघिणीस मानाचा त्रिवार मुजरा.